रस्ते
मला फिरायला खूप आवडतं. माझा दुसरा ब्लॉग वाचला असेल तर माहिती असेल तुम्हाला. भटकत राहावं नेहमी. इकडून तिकडे, तिकडून पुन्हा भलतीकडे. पायाला भिंगरी असल्यासारखं. सध्या तरी हे फार शक्य नाही होत. पण जमेल तेव्हा मी एका पायावर तयार असते.
या वेळेस दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वर दौरा केला. तस महाबळेश्वर काही नवीन नाही, पण अजून एक फेरी सही. पोलादपूर पासून पुढे महाबळेश्वर पर्यंत घाटच- अंबेनळी घाट. जातानाचा प्रवास छान झाला. परतताना मात्र महाबळेश्वर मध्ये एवढं traffic जाम होत संध्याकाळी; बस स्टँड च्या आसपास फक्त ४-५ किलोमीटर साठी आम्हाला १ ते १:३० तास वेळ गेला. दुतर्फा जवळपास हजार गाड्या अडकल्या असतील तेव्हा तिथे. आणि महाबळेश्वर मधले रस्ते इवलुसे. एका वेळी दोनच गाड्या बसणार रस्तावर. एक जाणारी आणि दुसरी येणारी. मग यात जर कुणाला त्याची गाडी इकडे तिकडे वळवायची आहे किंवा U टर्न घ्यायचा आहे तर मग बाकीच्या गाड्यांना जरा थांबून त्यांना जागा द्यावी लागते. पण मग यात कधी कधी लोक भयंकर गडबड करतात, चिडचिड करतात आणि उडतो तो निव्वळ गोंधळ. त्या बिचाऱ्या एका गाडीवाल्याला जेरीस आणतात. कधी कधी जागा च नाही देत. आयत्या गोंधळात अजूनच भर! मग त्यात कुणी एक चांगला गाडीवाला असतो, तो संयम दाखवत आपली स्वतःची गाडी थांबवतो. त्याला बघून समोरून येणाऱ्या पण गाड्यांचे गाडीवान पण जरा अदबीने घेतात आणि मग त्या बिचाऱ्या अडकलेल्या गाडीला जागा मिळते आणि मग ती निघते.
कधी कधी कुणी टोल नाक्यावर किंवा इतर तत्सम ठिकाणी सुद्धा गाडी अशी काही घुसवलेली असते की ती कोणत्याच लाईन मध्ये नसते. घर के ना घाट के, दुश्मन लाईन के!
अस मुद्दाम लवकर निसटायला मिळावं म्हणून रांग मोडून मध्येच घुसलेले लोक सुद्धा दिसतात.
असाच अजून एक रस्त्यातला किस्सा!
ताम्हिणी घाटातून येत असताना एका ठिकाणी जाम मज्जा आली. म्हणजे मलाच फक्त. ताम्हिणी घाटात रस्ता चांगला होता. नुकतच काम झालंय. फक्त मोजून तीन ठिकाणी रस्ता खराब आहे. खराब म्हणजे रस्ताच नाहीये तिथे. ओबड धोबड दगड आणि खूप खूप मोठे खड्डे. एखादा ओहोळ ज्यात पाणी नाही, असा काहीसा झालाय रस्ता, त्या तिन्ही ठिकाणी. तिथे फार मज्जा येते. ग्राउंड clearance जास्त असणाऱ्या गाड्या ठीक ठाक निघून जातात तिथून. त्यांना फक्त खड्डे चुकवत जायचं असतं. पण... कमी ग्राउंड clearance असणाऱ्या गाड्या, जस की सेडान cars, हॅच बॅक cars यांची फार तारांबळ उडते. खड्डे चुकवण्याच्या नादात गाडी खाली टेकत असे. ड्रायव्हर ची चांगलीच कसरत तेवढ्या भागात पाहायला मिळते. मोठी बस तर असे काही हेलकावे खाते, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे डुलकया घेत एकदाची खड्डे पार करत चांगल्या रस्त्याला लागते.
तेवढ्या तीन भागात गाड्या एकदम स्लो, एकदम कासव गती. सावकाश! त्यात एखाद वेळी समोरून येणारा कुणी एक ड्रायव्हर दुसऱ्या ड्रायव्हर ला मदत वजा सल्ला देत ओरडुन सांगत असतो - "अरे साईड ला घे गाडी, साईड ला घे".
एक कार तर अशी अलगद अडकली होती. चारही टायर खड्ड्यात. चार पाच लोक तर चालत येताना दिसले. विचारलं तर म्हणे गाडीत वजन नको म्हणून उतरलो एवढ्या जागेत.
बहुतेक आता नीट झाल्या असतील त्या तीनही जागा. पण त्या खराब होत्या तेव्हाच्या गमती जमती एकदम मस्त!
Quite interesting experiences! I understand the efforts spent in navigating way on such roads; had experienced the same on Maharashtra - Karnataka border area many times on the way to Goa. 😅
ReplyDelete